सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर) येथील अध्यात्मिक व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी बापू देवराम कटके( वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते संत सोपानकाकांच्या पालखीबरोबर श्री चतुर्मुख भैरवनाथ सेवा पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळात वारकरी म्हणून गेले होते. संत सोपानकाका यांची पालखी ३० जून रोजी बारामती येथे विसावली असताना ते आजारी पडले. दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांनी व नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.परंतु आजारपणातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भिवरी पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला. जगन्नाथदादा कटके व बापू कटके या दोन संख्या बंधूंची राम लक्ष्मणाची जोडी आपल्या आई-वडिलांचा उत्तम संसार, धार्मिक वृत्ती ,समाजसेवेचा वारसा पुढे चालवत होती. शेती, उद्योग ,आध्यात्मिक ,धार्मिक क्षेत्रात त्यांनी मन लावून कार्य केल्याने आर्थिक भरभराटी बरोबरच सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. भिवरी पंचक्रोशीच्या विकासकामात त्यांचा मोलाचा सहभाग होता. भिवरी येथील श्री चतुर्मुख भैरवनाथ सेवा पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळ्याच्या उभारणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. दिंडी सोहळ्यातील सर्व कामे अत्यंत कष्टाने, प्रामाणिकपणे पार पाडीत असत. ३० जून रोजी बापू कटके यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण भिवरी परिसर शोक सागरात बुडाला. सर्व वारकरी लोकदैवत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे वाटचाल करत असताना बापू कटके यांच्यासारखा निस्सीम विठ्ठलभक्त, सच्चा वारकरी, उत्तम शेती व्यावसायिक, उद्योजक पवित्र अशा वारी पर्वात निधन पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. अंत्यविधी प्रसंगी अफाट जनसागर लोटला होता. त्यांचे अखेरचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी त्यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करत त्यांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या मागे बंधू,बहिणी, पत्नी, दोन मुले, दोन मुली,दोन पुतणे,दोन पुतण्या, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भिवरी गावचे माजी उपसरपंच जगन्नाथ कटके यांचे ते बंधू होत. गृहिणी श्रीम. इंदुबाई शिवाजी घिसरे ,सौ. पारूबाई महादेव सावंत, सौ.सरूबाई राजाराम जगदाळे ह्या त्यांच्या बहिणी होत. गृहिणी संजना कटके यांचे ते पती होत. लता कटके यांचे ते दीर होत. शेती व्यावसायिक संतोष कटके, महेश कटके, गृहिणी वंदना महेंद्र जगदाळे, कल्याणी गणेश झेंडे यांचे ते वडील होत. जे.के. डेव्हलपर्सचे डायरेक्टर गणेश कटके ,उद्योजक ज्ञानेश्वर कटके, गृहिणी वैशाली कुंडलिक घिसरे, शुभांगी भैरवनाथ घिसरे यांचे ते चुलते होत. वैष्णवी कटके, सारिका कटके, सोनाली कटके, अर्चना कटके यांचे ते सासरे होत.