Baramati Breaking l नातीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या दुचाकीला बसची धडक : फलटणचे जेष्ठ पत्रकार ठार, नात जखमी : निरा-बारामती रस्त्यावरील शारदानगर येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
ओंकार आचार्य व त्याच्या मुलींचा वेगवान वाहतुकीच्या अपघातात बळी गेल्यानंतर एक महिनाही उलटत नाही...! तोच पुन्हा एकदा बेदरकार वाहतुकीने बारामती मध्ये आज पुन्हा आजोबा आणि नातीला लक्ष्य केले. यामध्ये पत्रकार असलेल्या आजोबांचा मृत्यू झाला तर खेळांमध्ये अनेक विक्रम केलेली नात गंभीर जखमी झाली आहे.
          आज सकाळी बारामती निरा रस्त्यावर शारदानगर येथे हा दुर्देवी अपघात घडला. बारामती आगाराची राज्य परिवहन महामंडळाची बस दुचाकीला धडकल्याने सकाळी पावणे सात वाजता झालेल्या या अपघातामध्ये फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय 59 वर्ष रा. गोखळी ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दुचाकी वर असलेली अनेक खेळांमध्ये विक्रम केलेली त्यांची नात स्वरा भागवत ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बारामतीत उपचार सुरू आहेत. 
         प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता बारामती निरा रस्त्यावर शारदानगर मध्ये हा अपघात झाला. बारामतीकडून निरेकडे बस निघाली होती. त्याचवेळी आपल्या नातीला शारदानगर येथे सोडण्यासाठी राजेंद्र भागवत हे स्वराला घेऊन दुचाकी वर आले होते. त्यांची दुचाकी माळेगाव कडून शारदानगर कडे वळत असताना समोरून आलेल्या भरधाव बसने जोरदार धडक दिली.

यात डोक्याला गंभीर जखम झाल्याने राजेंद्र भागवत यांचा मृत्यू झाला. तर स्वरा ही देखील या घटनेमध्ये जखमी झाली. तिला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात आले आहे. एका महिन्यात सातत्याने वारंवार होत असलेल्या या अपघाताच्या घटनांमुळे बारामतीकर मात्र हादरले आहेत.
To Top