सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ या सालात तुटून गेलेल्या उसाला ३ हजार ४०० रुपये अंतिम दर देण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. २१ रुपये कपात वजा जाता टनाला २०६ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
आज दि. २८ रोजी जिजाऊ सभागृहात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. सन २०२४-२५ या सालात शेतकऱ्यांचा तुटून आलेल्या उसाला सोमेश्वर कारखान्याने यापूर्वीच टनाला रकमी २८०० रुपये अदा केले होते. हंगाम संपल्यानंतर टनाला ३७३ रुपये देण्यात आले. असे आतापर्यंत सभासदांना टनाला ३१७३ रुपये अदा करण्यात आले होते. आज संचालक मंडळाच्या झालेल्या मासिक सभेत गत वर्षीच्या उसाला टनाला ३४०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. हा दर राज्यात उच्चांकी दर असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली. उर्वरित राहिलेले २२७ रुपयांमधून वार्षिक सभेत सभासदांनी कपातीला परवानगी दिली तर शिक्षण निधी टनाला २० रुपये व सोमेश्वर देवस्थानसाठी टनाला १ रुपया असे २१ रुपये कपात केले जाणार असून उर्वरित टनाला २०६ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत.
त्याच बरोबर बिगर सभासदांसाठी टनाला ३२०० रुपये दर जाहीर करण्यात आला असून आतापर्यंत बिगर सभासदांना टनाला ३१७३ रुपये अदा केले असून उर्वरित टनाला २७ रुपये दिले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.