सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने गुप्त माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचुन सातारा महाबळेश्वर रोडवर अवैध खैर लाकूड तस्करी करणारा पिकअप पकडून जप्त केला असून या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वा. महाबळेश्वर-सातारा मार्गावर ही कारवाई करण्यात आली असून वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार डांगरेघर-केंडबे मार्गे मेढा या दिशेने खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याने त्यानुसार भरारी पथकाने डांगरेघर येथे काटेकोर सापळा रचला होता. रात्री १०.३० वा. महिंद्रा पिकअप (क्र. MH 11 T 7852) दिसताच पिकअपची थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये कात तयार करण्यासाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीचा सोलीव लाकूडमाल सापडला. चौकशीत सदर मालाची वाहतूक पूर्णपणे अवैधरित्या होत असल्याचे स्पष्ट झाले.
सदरची कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.), विभागीय वनअधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाही मध्ये वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपाल डी.डी. बोडके, वनरक्षक रामेश्वर घुले, अश्विनी नागवे, पोलीस कॉस्टेबल प्रकाश वाघ, चालक दिनेश नेहरकर, यांचा समावेश होता.