सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
पुणे-बंगळुरू महामार्गावरील पारगाव खंडाळ्यामध्ये मोनाली लॉजवर चालणाऱ्या अनाधिकृत कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा, मानवी व्यापार प्रतिबंधक पथक व खंडाळा पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या सात जणांवर कारवाई करत ताब्यात घेतले व सहा पीडित युवतींची सुटका करण्यात आली.
यामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यातील अवैध कुंटणखान्यावर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. यावर अरुण देवकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, पारगाव खंडाळा या ठिकाणी साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोनाली लॉजच्या चालकाद्वारे वेश्याव्यवसाय सुरू असून पुरुष ग्राहकांच्या मागणीनुसार मुलींचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडुकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक सातारा व खंडाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले. डॉ वैशाली कडुकर व या पथकांद्वारे बुधवारी दि.13 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोनाली लॉजवर छापा मारला असता वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईमध्ये राहुल वसंता शृंगारे (रा.शिरवळ), रावेत शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरीश वासुदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले, रंजनकुमार लक्ष्मण मलिक (सर्व रा. मोनाली लॉज, पारगाव ता.खंडाळा) या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेत व सहा पीडित महिलांची सुटका पोलिसांद्वारे करण्यात आली. घटनास्थळावरून बाराशे रुपये रोख, 80 हजार रुपयांचे आठ मोबाईल व 41 हजार रुपयांचे निरोध असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून पोलिसांनी हस्तगत केला. आरोपींना खंडाळा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार दि.18 पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित सात जणांवर खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विक्रम पिसाळ, रविराज वर्णेकर, मोना निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, तृप्ती शिंदे, शहनाज शेख, खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दत्ताजी दिघे, अमित चव्हाण, धीरज नेवसे यांच्याद्वारे करण्यात आली.