सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
प्रत्येकाच्या घरात पुस्तकं असणे हीच खरी त्या घराची श्रीमंती होय. जगात जी माणसं मोठी झाली ती पुस्तकं वाचून झाली. पुस्तकी ज्ञानाने माणूस सशक्त होतो आणि सशक्त माणूस कोणापुढे नतमस्तक होत नाही. त्यामुळे मोबाईलच्या वाढत्या युगात पुस्तकं वाचन संस्कृती वाढली पाहिजे असे मत हभप प्रमोदमहाराज जगताप यांनी व्यक्त केले.
सुपे ( ता. बारामती ) येथील ऐश्वर्य विठ्ठल मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन आणि ज्ञानेश्वर महाराज जन्म सोहळ्यास ७५० वर्षे झाली. यावर आधारीत त्यांनी कीर्तनात निरुपम केले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथे सात दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यामध्ये विणावादन, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि हरिजागर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने यावेळी पालखीत संत ज्ञानेश्वरांची मूर्ती तर रथामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवुन मुख्य पेठेतून ग्रामप्रदक्षणा काढण्यात आली. त्यानंतर ऐश्वर्य विठ्ठल मंदिरामध्ये रात्री ग्रामस्थाच्या उपस्थितीत दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. तर शनिवारी सकाळी हभप प्रमोद जगताप यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप होऊन सप्ताहाची सांगता झाली.
************************