सुपे परगणा l सुप्यात विविध प्रकारातील बाप्पांच्या मुर्ती विक्रीसाठी सज्ज

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील कुंभारवाड्यामध्ये विविध प्रकारातील बाप्पांच्या मुर्ती विक्रीसाठी सज्ज होऊन त्यावर बुकिंगसाठी इच्छुकांची वर्दळ वाढू लागली आहे. 
           बाप्पांच्या मुर्तीची विक्री करण्यासाठी कुंभारवाड्यातसह व्यापारीपेठेत स्टॉल सजु लागले आहेत. या स्टॉलमध्ये विविध आकाराचे तसेच विविध प्रकारातील बाप्पांच्या मूर्ती पाहावयास मिळत आहेत. यामध्ये पांडुरंग, राजाहंस, बैलगाडी, गाय, गरुड, बाळूमामा, राम, हत्ती, सिंहासन, लालबागचा राजा, तितवाला, जास्वंद, सूर्यफूल, अष्टविनायक, सरदार फेटा, पगडी, कृष्ण, शेषनाग, वेगवेगळे सिंहासन अशा विविध प्रकारात मूर्ती विक्रीसाठी आहेत. त्यामुळे मूर्ती बुकिंग करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे.      
        यासंदर्भात गणेश मूर्तींचे विक्रेते दादासाहेब कुंभार म्हणाले, "आमची ८८ वर्षांपासूनची परंपरा आहे. पूर्वी घरगुती शाडू मातीचे गणपती तयार करून विक्री करीत होतो. मात्र त्यानंतर कालांतराने बदल होऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना अधिक मागणी वाढली आहे. 
       येथे लहानात लहान मूर्ती अगदी दोनशे रुपयांपासून नऊ हजार रुपयांपर्यंत आहेत. छोट्या मूर्ती घरगुती प्रतिष्ठापनेसाठी घेतल्या जातात. मोठ्या मूर्तींना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची मागणी असते. यावर्षी पर्यावरणाला पूरक अशा शाडू मातीच्या मूर्तीला मागणी वाढू लागली असल्याचे त्यांनी सांगितले." 
    तर अहिल्यानगर, बारामती येथून मूर्ती खरेदी करावी लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने मूर्तींचे भाव दरवर्षी पाच, दहा टक्क्यांनी वाढतच राहतात. मूर्तींचे भाव वाढले तरी दरवर्षी मागणी मात्र वाढतच राहते अशी माहिती मूर्ती विक्रेते अनिल कुंभार, सागर तेली यांनी दिली.
      ............................................
To Top