Baramati Breaking l मजुराचा खून केला...आणि मृत्यूदेह मुरूमाच्या ढिगाऱ्याखाली पुरला : नारोळी येथील धक्कादायक घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील नारोळी येथील फार्म हाऊसवर एका मजूर कामगाराचा खून करून मृत्यूदेह मुरूमच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवल्याची घटना शुक्रवारी ( दि. २६ ) सकाळी आठच्या दरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे या घटनेने नारोळीत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

      गणेश शंकर चव्हाण ( वय ४९ वर्षे, मुळ रा. आद्रहळी ता. शिराटी जि. गदक, राज्य कर्नाटक सध्या. रा नारोळी ता. बारामती जि.पुणे ) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. 

         पोलीस कॉनस्टेबल रुपेश साळुंके यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील छाया रमेश महाडीक यांच्या फार्म हाऊस वर संरक्षण भिंतचे काम सुरु होते. दोन दिवस पाऊस असल्याने काम बंद होते. त्यामुळे त्या ठिकाणी चव्हाण आणि नागेश चंदबसप्पा बुधियाला ( मुळ रा. राज्य कर्नाटक, सद्या नारोळी पुर्ण पत्ता माहीत नाही ) हे दोघेच वास्तव्यास होते. त्यामुळे नागेशनेच त्याचा धारदार शस्त्राने खून केल्याचा संशय आहे. 

          या ठिकानाहून चव्हाण बुधवारी ( दि. २४ ) बेपत्ता झाल्याची खबर नागेशनेच पोलीस स्टेशनला दिली आहे. मात्र त्यानंतर नागेश फरार झाला आहे. शुक्रवारी ( दि. २६ ) सकाळी महाडीक यांच्या घराच्या समोर असणाऱ्या मुरूमच्या ढिगाऱ्या जवळ भटकी कुत्री भुंकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांना ही माहिती मिळताच त्याठिकाणी चव्हाण याचा मृत्युदेह आढळून आला. 

        घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने तपास केला असता, मृतदेहावरील खुणा आणि उजव्या खांद्यावरील वाघाचे गोंदलेले चित्र यावरून तो गणेश चव्हाण यांचाच मृत्यूदेह असल्याचे निश्चित झाले. यावेळी महाडीक यांच्या घरामध्ये राहत असलेल्या खोलीची फॉरेन्सीक टीमसह पाहणी केली असता, त्या खोलीमध्ये रक्त सदृश डाग असलेला चाकु मिळुन आलेला आहे.

      तसेच त्यांचेकडील उपलब्ध असलेल्या अल्ट्रा व्हायलेटन लाईटचा वापर करून खोलीची सखोल पाहणी केली असता फरशीवर रक्त सदृश डाग मिळुन आलेले आहेत. ही घटना घडली या ठिकाणापासुन १०० ते १५० फुट अंतरावरील कॅनॉल बाजुच्या झाडे झुडपामध्ये मिळुन आलेल्या चटई, घोंगडे व ब्लॅकेट यावर देखील रक्त सदृश डाग दिसुन आले आहेत. त्यामुळे हा खून नागेशने केला असून फरार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. 

      दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, महसूल विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहे. 

          ................................
To Top