सुपे परगणा l सुपे मंडलांतर्गत १२ गावांतून ९५ शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी : साडे आठ हजार शेतकऱ्यांना फायदा : डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे मंडलांतर्गत १२ गावांतून ९५ शेतरस्त्यांचा प्रश्न सहमतीने मार्गी लागला आहे. यामुळे सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांना रस्त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून लोकाभिमुख आणि शेतकरीभिमुख कामकाज होत असल्याचे मत विभागिय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी व्यक्त केले. 
     अद्यापही आपल्याकडे सेवा पंधरवड्याचे चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे या मंडलांतर्गत रस्त्यांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणे विभागात सुपे मंडलचे काम अतिशय उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. 
       यावेळी सुपे मंडलपरिसरात डॉ. फुलकुंडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते. 
   फुलकुंडवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान राज्यभरात राबवण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्यामध्ये पहिला टप्पा रस्ते उपलब्ध करून देण्याबाबतीत होता. या पहिल्या टप्प्यांमध्ये सुपा मंडलांतर्गत चांगले काम झाले आहे. आता या रस्त्यांची नोंद गाव नकाशावर आणि अधिकार अभिलेखांमध्ये घेण्यात येत आहे. हे काम अत्यंत प्रशंसनीय असल्याने डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 
    अनेक वर्षाचे शेत रस्त्यांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागून शेतकरी व ग्रामस्थांना रस्त्याचा उपयोग होणार आहे. यापुढे या रस्त्यांवर सरकारचा निधी पडून चांगले रस्ते होतील. त्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर होणार असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले. 
      रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकरी स्वतःहून पुढे येऊ आमच्याही रस्त्याचा प्रश्न मिटवा, अशी शेतकऱ्यांची मागणी वाढत गेली. त्यामुळे आम्ही रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न मिटावले असल्याचे मंडलाधिकारी हंसध्वज मनाळे यांनी सांगितले. याकामी ग्राममहसूल अधिकारी नीलेश गद्रे, राहुल केंद्रे, आशुतोष पाटील, नीलम देशमुख, अनिता धापटे, कर्मचारी राहुल बोडरे आदींसह त्या त्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल आणि शेतकरी आदीचे सहकार्य मिळाले. 
       ........................................
To Top