सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : सचिन पवार
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. २५ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या ठरावानुसार, हंगाम २०२४-२५ मध्ये नोंदवलेला ऊस गळपास न दिलेल्या सभासदांना दिवाळी २०२५ साखर वाटपातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
तसेच जिरायती शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाण्याअभावी आडसाली लागण फारच कमी प्रमाणात होते. कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणे तारीख जुळत नसल्याने, फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऊसतोड मजूर उपलब्ध झाल्यावर त्यांच्याकडे पाणी नसते. त्यामुळे काही शेतकरी नाईलाजास्तव ऊस इतर कारखान्याला गळपास करतात. अशा परिस्थितीत, सभासद असूनही त्यांना दिवाळी साखरेपासून वंचित ठेवणे हा दुजाभाव असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
"पाण्याअभावी आमचा ऊस कारखान्याला देता येत नाही, म्हणून बाहेरील कारखान्याला ऊस देण्याची वेळ येते. तरीदेखील आम्ही सभासद आहोत. दिवाळी साखरेच्या वाटपातून आम्हाला वगळणे चुकीचे आहे," असे जिरायती शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या वतीने माजी संचालक गणेश निवृत्ती चांदगुडे यांनी संचालक मंडळाकडे शेतकरी लेखी विनंती करून दिवाळी साखरेच्या वाटपात वगळलेल्या सभासद शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी करणार असुन शेतकरी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहे अशी माहीती चांदगुडे यांनी दिली,