सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्या चार इसमांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गुन्हे दाखल केले असून, एकूण 5 लाख 66 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे परिसरातील बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निंबुत गावच्या हद्दीत संशयास्पद पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इर्टिगा गाडी (क्र. MH-42 AQ-1006) ला अडवून तपासणी करण्यात आली. पाहणीदरम्यान गाडीत निळ्या व काळ्या रंगाच्या 35 लिटर मापाच्या 6 कॅनमध्ये तयार गावठी हातभट्टी दारू आढळून आली.
गाडीतील इसम अनिरुद्ध भालचंद्र तुरकुंडे (रा. कसबा बारामती) याने चौकशीत सांगितले की हा मुद्देमाल विठ्ठल चव्हाण (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) यांच्या सांगण्यावरून आणला आहे. पोलिसांनी गाडी आणि दारू असा मिळून ₹5,09,600 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस हवालदार सागर देशमाने हे करीत आहेत.
तसेच मुर्टी गाव हद्दीत दुचाकी पकडली. दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 वाजता, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुर्टी गावच्या हद्दीत स्कुटी (क्र. MH-42 BG-2389) ला अडवून तपासणी करण्यात आली. गाडीवरून गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले दोन कॅन (35 लिटर प्रत्येकी) असे 70 लिटर दारू जप्त करण्यात आले.
गाडीवरील इसमांची नावे प्रमोद प्रकाश नवले (रा. निंबुत, ता. बारामती) व शुभम सुरेश शिसोदिया (रा. दर्पन टॉकीज, दहोद, गुजरात) अशी असून दोघांनीही चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गाडी व दारू असा ₹57,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे यांच्याकडे आहे.
या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी मिळून एकूण 240 लिटर गावठी हातभट्टी दारू, एक चारचाकी आणि एक दुचाकी असा मिळून ₹5,66,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, दीपक वारुळे, पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे, सागर देशमाने, पोपट नाळे, पोलीस शिपाई विलास ओमासे, आबा जाधव, सूरज धोत्रे यांनी मिळून केली.
या कारवाईमुळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.