Phaltan News l अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वृद्धाचा मृत्यू : लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
फलटण-लोणंद दरम्यान पालखीमार्गावर तरडगाव नजीक चाळशीमळा (ता. फलटण) येथे झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणंद पोलीस ठाण्यातील माहितीप्रमाणे, हर्षद हेमंत गायकवाड (वय 29, रा. बालाजीनगर, पुणे, मुळ रा. तरडगाव, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांचे चुलते बाळकृष्ण श्रीरंग गायकवाड (वय 63, रा. दिवाणवाडा, तरडगाव) हे आपल्या टीव्हीएस ज्युपिटर (क्र. MH-11-CE-4690) या दुचाकीवरून लोणंदकडे जात होते.

दरम्यान, मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाळकृष्ण गायकवाड गंभीर जखमी झाले असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. फिर्यादीने अज्ञात कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार दिली आहे.
या प्रकरणी लोणंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोफौ येळे हे करत आहेत, तर प्राथमिक तपास पोहवा मिसाळ यांनी केला आहे. सपोनी भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
To Top