सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील सहा गणांसाठी आरक्षण काढण्यात आलेल्या पैकी आंबेघर तर्फ मेढा हा गण नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून खुर्शी बारामुरे आणि कुडाळ गण हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे तर म्हसवे, सायगाव आणि कुसुंबी गण हे खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांचे प्रमुख उपस्थितीत तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी सहा गणांचे आरक्षण जाहीर केले. यावेळी गट विकास आधिकारी निलेश पाटील, नायब तहसिलदार सुनिल मुनाळे सह इतर कर्मचारी उपस्थित होते. सहा गणांपैकी गत वेळी दोन गण ओबीसीसाठी आरक्षित होते पण यावेळी एक गण ओबीसी साठी आरक्षित झाल्याने ओबीसी मध्ये नाराजी पसरली आहे.
७१ खर्शीबारामुरे गण खुला, ७२ म्हसवे गण खुला -महिला, ७३ कुडाळ गण - खुला, ७४ सायगाव गण - खुला महिला, ७५ आंबेघर तर्फ मेढा गण - नागरिकांच्या मागास प्रवर्ग आणि ७६ कुसुम्बी - खुला महिला आरक्षण पडले असून मातब्बरांच्या आशा अपेक्षांवर आरक्षणाने पाणी फिरले आहे. गुडग्याला बाशिंग बांधून तयार असणारांना घोड्यावर बसण्या ऐवजी वऱ्हाडी म्हणून मिरविण्याची नामुष्की आली असली तरी मी नाही तर सौभाग्यवती साठी लढण्याचा मनोदय व्यक्त होताना दिसत होता. पक्ष श्रेष्टीं आता कोणाला संधी देतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
यावेळी आरक्षण सोडत ही श्रीषा या शाळकरी मुलीच्या हस्ते करण्यात आली. भाजप , शिवसेना (शिंदेगट ) यावेळी उपस्थित होते तर अनेकांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली होती. आरक्षण सोडत शांततेत संपन्न झाली.
तसेच सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जावळी तालुक्यातील तीन जि.प. गटासाठी आराक्षण सोडत जिल्हाधिकारी यांनी म्हसवे गटात नागरीकांचा मागास प्रवर्ग, कुडाळ गटामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आणि कुसुंबी गटात खुला राखीव महिला आरक्षण सोडत जाहीर केली.