सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावळी तालुक्यातील शेतकरी गेली ६ महिने सातत्याने पडणार्या पावसामुळे संकटात आला असताना हातातोंडाशी आलेले भाताचे पिकही हातातुन जात असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे जावली तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र पहावयास मिळत असून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
शासनाने जावळी तालुक्याच्या आसपासच्या तालुक्यांना ओल्या दुष्काळाच्या यादीत बसविले पण निकषाच्या आधारावर जावळीला मात्र नाकारले.
मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन, कडधान्याची पेरणी करता आली नाही. भातशेती थोडी बरी दिसत होती, पण डूकरांनी उध्वस्थ केली. थोडे फार उरलेले धान्य घरात येईल असे वाटत असताना भात काढणीच्या प्रतिक्षेत असणार्या शेतकर्यांवर पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाल्याचे दिसत आहे.
पाऊस सतत पडत असल्याने हातातोंडाला आलेले भात काढणी विना शेतात आडवे झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या वर्षी सतत पडणार्या पावसामुळे जावळी तालुक्यातील शेतकर्यांवर अस्मानी संकट आले आहे. कडधान्य व सोयाबीन विकून सामान्य शेतकरी दिवाळीचा सण साजरा करतो पण यावर्षी पेरणीच न झाल्याने शेतकरी वर्गाची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झाल्याचे चित्र दिसत आहे.
जावली तालुक्यातील शेतकऱ्याचे मुख्य पीक भाताचे असून त्याच्यावरच वर्ष काढता येईल अशा आशेवर असणारा शेतकरी आता मात्र चिंतातूर झाला आहे. त्यातच रानातील जनावरांनी पिके आडवी केली आहेत. हाळवी भाते काढायला आली असून पाऊस मात्र थांबायचे नावच घेत नाही.
अजून चार-आठ दिवस पाऊस थांबला नाही तर शेतात आडवी पडलेली पिके उगवायला सुरूवात होईल अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. खरतरं लोकप्रतिनिधींनी शेताच्या बांधावर जावून पंचनामे करावेत असे आदेश दिले असले तरी महसुल व कृषी विभागातील किती अधिकारी व कर्मचारी शेतकर्याच्या शेतावर पोहचले हा चिंतनाचा विषय आहे.
जनावरांकडून होणार्या नुकसानीबाबत वनविभागाची नेहमीच उदासिनता दिसून येत आहे.
आता अशा चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या व निकषाच्या कायद्यात अडकलेल्या जावळी तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा मिळणार तरी कसा असा प्रश्न जावळीतील सामान्य शेतकरी वर्गाला पडला आहे.
