सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद (ता. खंडाळा) येथे घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या खळबळजनक घटनेचा लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शिक्षणासाठी माळीआळी परिसरात भाड्याने राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची माहिती डायल ११२ वर प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मयत तरुणाचे नाव गणेश संतोष गायकवाड (वय २२, रा. पिंपळसुटी ता. शिरूर, जि. पुणे, सध्या लोणंद) असे आहे. प्राथमिक तपासात घटनेची माहिती देणारा त्याचाच रूममेट असल्याचे समोर आले. मात्र, त्याच्या वागण्यात संशयास्पद बाबी आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर कुशल तपास व बुध्दीकौशल्याच्या जोरावर त्याच्याच कबुलीजबाबातून खुनाचा उलगडा झाला.
या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉड पथकांना घटनास्थळी पाचारण करून आवश्यक पुरावे हस्तगत केले. या कारवाईत पो. उपनिरीक्षक रोहित हेगडे, डी.बी. पथकाचे अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
लोणंद पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि तपासकौशल्यामुळे या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत उलगडा झाला असून सर्व स्तरांवरून लोणंद पोलिसांच्या या कार्याची प्रशंसा केली जात आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले हे करीत असून या पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांच्या उत्कृष्ट समन्वयाचे कौतुक होत आहे.
