Baramati News l गावाकडे आई-वडिलांना भेटण्याचे 'सिद्धांत'चे स्वप्न अपुरेच : मुंबईवरून गावाकडे येताना रेल्वे रुळावर पडल्याने ...! वाणेवाडी गावावर शोककळा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (ता. बारामती) येथील सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप या तेवीसवर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. शनिवारी कोयना एक्स्प्रेसमधून मुंबईहून पुण्याला येत असताना बदलापूर रेल्वे स्थानकानजीक अज्ञात कारणाने रूळावर पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सिध्दांत हा सोरटेवाडी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डी. वाय. जगताप यांचा मुलगा आहे. तोही नम्र आणि मनमिळावू असल्याने वडिलांप्रमाणेच लोकसंग्रह होता. पदवीचे शिक्षण घेताच त्याला दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे ज्ञानदीप सहकारी बँकेत लेखनिकपदी नोकरी मिळाली होती. सुट्टीला तो पुण्यात किंवा वाणेवाडीला येत असे. गावाकडे काही काम नसल्याने आईवडिलांनी त्याला आताच्या शनिवारी-रविवारी इकडे येऊ नको, त्याऐवजी पुढील आठवड्यात ये असा आग्रह केला होता. मात्र नातेवाईकांसोबतच सुट्टी घालवायची म्हणून आवर्जून तो आज सकाळी कोयना एक्स्प्रेसने पुण्याला येत होता.
त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या दरम्यान बदलापूर रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर तो रेल्वे रूळावर पडला. डोक्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कुठल्या कारणाने रूळावर पडला याबाबतचा तपशील समजू शकला नाही. रेल्वे पोलिसांनी वडिलांना संपर्क केल्यानंतरच या घटनेचा उलगडा झाला. जगताप यांना एक विवाहीत मुलगी आणि सिद्धांत हा मुलगा होता. सिद्धांतचा गुरुवारीचा तेविसावा वाढदिवस झाला होता.
---
To Top