सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
देशाचा भावी नागरिक सक्षम आणि गुणवान सुसंस्कृत होण्यासाठी मूल्यशिक्षण देणे काळाची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांनी प्रशिक्षणात जे ज्ञान ग्रहण केले, ते विद्यार्थ्यापर्यत पोहचविण्यात शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन सुपे केंद्राचे केंद्रप्रमुख शरद मचाले यांनी केले.
सुपे ( ता. बारामती ) येथील श्री शहाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बारामती पंचायत समिती शिक्षण विभाग व शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय बीटस्तरीय मूल्यवर्धन या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मचाले बोलत होते.
यावेळी सुपे, मोरगाव व देऊळगाव रसाळ आदी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. या तीनही केंद्रातील सुमारे ६३ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मूल्यवर्धन हा महत्वाकांक्षी उपक्रम असून राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांत मूल्ये व क्षमता विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी शहाजी विद्यालयातील हनुमंत जगताप, आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयातील हेमंत गडकरी व देऊळगाव रसाळ येथील वसंतराव पवार विद्यालयातील विजय साळुंखे यांनी सुलभक म्हणून काम पाहिले. यावेळी मोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र तावरे, सुपे विद्यालयाच्या प्राचार्या एस. ए. लोणकर, लता लोणकर आदी उपस्थित होते.
....................................
