सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील निगुडघर ता.भोर मंडलाधिकारी रूपाली अरुण गायकवाड यांच्यावर माती परवानाधारकाकडून दीड लाखाची लाच मागण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर लाचलुचपत विभागाने भोर शहरातील अभिजीत मंगल कार्यालय शेजारील मोकळ्या माळावर सापळा रचून १ लाखाची लाज घेतना गुरूवार दि.४ रोजी कारवाई केली.
याबाबत मिळालेले माहितीनुसार तक्रारदार यांनी तहसीलदार भोर यांच्याकडून २०० ब्रास माती वाहतुकीचा परवाना घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १ लाख २६ हजार २३० रुपये रॉयल्टीच्या स्वरूपात भोर तहसील कार्यालयात भरले आहेत. तक्रारदार ज्या भागातून माती उचलत आहेत त्या मंडळाच्या मंडळ अधिकारी रूपाली गायकवाड यांनी तक्रारदार यांच्या परवान्यामध्ये नमूद असलेल्या गाड्यांमधून माती वाहतुक करीत असताना गाड्या अडवून इथून पुढे मातीच्या गाड्या चालू ठेवण्याकरिता तक्रारदाराकडे १ लाख ५० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत माती वाहतूक बंद ठेवायची अशी धमकी देऊन पकडलेल्या गाड्या सोडून दिल्या.त्यानंतर आरोपी तक्रारदारास वारंवार त्यांच्या कार्यालयात भेटण्याकरीता बोलवत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि.३ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता रूपाली गायकवाड यांनी तक्रारदारास भोर शहराच्या बाहेर अभिजीत मंगल कार्यालय भोर येथे बोलावून तक्रारदार कायदेशीररित्या माती वाहतूक करत असलेल्या व्यवसायाला यापुढे सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त शिरीष देशपांडे,अर्जुन भोसले,अजित पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर,अविनाश घरबुडे यांनी केली.
