सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
पंढरपूर–पुणे मार्गावरील कोरेगाव(ता. फलटण) रेल्वे ब्रिजजवळ बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. आनंदा कृष्णा खताळ (वय 48, रा. झणझणे सासवड, ता. फलटण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
फिर्यादी अमोल गोवेकर यांच्या माहितीनुसार, आनंदा खताळ हे हिरो कंपनीची मोटरसायकल (MH-11-CA-2274) घेऊन सासवड येथून निरा येथे जात होते. दरम्यान, मागून आलेल्या कंटेनर (MH-41-CL-9890) वरील अज्ञात चालकाने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवत मोटरसायकलला जोराची धडक दिली. धडक झाल्यानंतर चालकाने अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अपघातात आनंदा खताळ यांच्या डोक्यास व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तपास पो. हवा. मोरे हे करत आहेत.
--------------------
सदोष पालखी महामार्गावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार?
पंढरपूर–पुणे या पालखी महामार्गावर सातत्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसरात तर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रस्त्याची धोकादायक रचना आणि भारवाहू वाहनांचा वाढता वेग यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा जीव धोक्यात येत आहे. संबंधित विभागांनी या मार्गावरील सदोष ठिकाणे दूर करून सुरक्षा उपाययोजना केल्या तरच अपघातांची भयावह मालिका थांबेल, अशी स्थानिकांची मागणी आहे. यापूर्वी या रस्त्यावर ११ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर आणि आता ४ डिसेंबर रोजी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
