Pune News l नव्या रूपात...वेगळ्या बदलांसह यंदाची १९ वी भीमथडी जत्रा 'या' तारखेदरम्यान पुण्यात पार पडणार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी                                              महिलांना सक्षम करणारी यंदाची १९ वी भिमथडी जत्रा नव्या रूपात व वेगळ्या बदलांसह अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक २० ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वा.कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर (सिंचननगर) पुणे येथे भरणार असल्याची माहिती आयोजक सुनंदा पवार यांनी दिली. 
         अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, ही संस्था गेली पाच दशके कृषी, शिक्षण, जलसंधारण, प्रशिक्षणे,  महिला बचत गट,  महिला सबलीकरण यासह कृत्रिम बुद्धिमत्ता अशा  वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करीत आहे. यापैकीच एक सामाजिक उपक्रम म्हणजे 'भीमथडी जत्रा'.  ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने संस्थेच्या वतीने गेली १८ वर्ष या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. हजारो महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी भीमथडी जत्रा अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढवत असून, महिलांना सामाजिक दृष्ट्या सक्षम करत आहे, याचा आयोजक म्हणून मला अभिमान आहे, असे मत आयोजक सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

या वर्षीच्या भिमथडीची “भारतातील स्थानिक फुलं” ही थीम  असल्याने भीमथडीच्या माध्यमातून  देशाच्या स्थानिक वनस्पतींचा वारसा जतन व नागरिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या वर्षी भीमथडी जत्रेत  प्रवेश करतानाच ग्राहकांचे मुगल बागेच्या सौंदर्यावर आधारित फुलांनी सजविलेल्या भव्य प्रवेश द्वारावर स्वागत केले जाईल.   

यंदाची भीमथडी जत्रा १९ व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राच्या  कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाकार व त्याच कलाकारांचे रेखाटन असलेली भव्य व सुंदर रांगोळी स्थानिक कलाकारांच्या कलेतून साकारण्यात येईल. (यामध्ये गोंधळी, पोतराज, भारुड, ज्योतिषी, पाथरवट, बुरुड,  केरसोनीवाले, नंदीबैल) . इत्यादी
                    
भीमथडी प्रदर्शनामध्ये मिलेट उत्पादनांसह, रेसिडू फ्री शेती उत्पादने,भौगोलिक मानांकन (जी आय) असलेले उत्पादने तसेच महिला सबलीकरणाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, मेथी मलाई, प्रीमिक्स मिलेट चिवडा, मातीची भांडी, बेल मुरांबा, खजूर लोणचे, ओल्या हळदीचे लोणचे,कपडे यासह 
शेतकऱ्यांचे उत्पादने जसे की, गुळभेंडी ज्वारी, हुरडा, सेंद्रिय गुळ, लाकडी घाणा तेल, परस बागेसाठी गावरान देशी बियाणे, फळबाग रोपे, पेरू फळे व भाजीपाला रोपे, पालेभाज्या, धान्य, कडधान्य, फळे,
विक्रीस उपलब्ध असतील.

पुणेकर  खवय्यांसाठी ग्रामीण महाराष्ट्रातील शाकाहारी व मांसाहारी भोजनाचे  85 पेक्षा जास्त स्टॉल  असणार आहेत. यामध्ये शाकाहारी व मांसाहारी मक्याची भाकरी, मेथीचे पिठले, कारळ्याची वांग्याची भाजी, गव्हाचा व गाईचा चिक गावरान तुपाची जिलेबी, खपली गव्हाची गावरान खीर,
मटण थाळी, कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा यासह नावीन्यपूर्ण 
जेजुरीची पुरणपोळी, खेकडा करी, इत्यादी. 
 
  या वर्षी भीमथडीत जेष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर उपलब्ध असून भीमथडी जत्रा “नो प्लास्टिक झोन” असणार आहे. भीमथडीत येताना ग्राहकांनी कापडी पिशव्या आणाव्यात असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे. 

         महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 24 पेक्षा जास्त  जिल्ह्यासह देशातील इतर १२ राज्यामधून महिला बचत गट, महिला उद्योजिका यांसह विविध कारागीर सहभागी होणार आहेत.   या भीमथडी जत्रेत महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांचे निवडक उत्पादनांचे सिलेक्ट दालन, भौगोलिक मानांकन दालन, पॅकिंग दालन, खाद्य विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या पर्यावरण वाचवा संदेश, अशी वेगवेगळी दालने व शेतीविषयक  माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल असतील. अधिक महितीसाठी www.bhimthadijatra.com यावर संपर्क करावा..
Tags
To Top