सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : अक्षय इथापे
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य अनेकदा केवळ सार्वजनिक विकासकामांवर लक्ष केंद्रित करतात. मात्र, मला संधी मिळाल्यास सार्वजनिक विकासासोबतच सरकारी योजनांचा 'वैयक्तिक लाभ' प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचवण्याला माझे प्राधान्य असेल..! असा ठाम निर्धार समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी आगामी निवडणुकीसाठी निंबूत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे. अजिंक्य सावंत यांनी आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले की, पंचायत समितीच्या माध्यमातून शेती, शिक्षण आणि आरोग्यविषयक अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. परंतु, माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र लाभार्थी यापासून वंचित राहतात. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येक गावात एक स्वतंत्र यंत्रणा राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार आणि विकासकामे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.
निंबूत गणातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या मागणीची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कशी घेतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप बांदल, सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, वाघळवाडी चे माजी सरपंच राजेंद्र काशीद, सागर गायकवाड, सुरज जाधव, गजानन सकुंडे, ऋत्विक सावंत, विक्रम सावंत, उपस्थित होते.
