Beed News l देवदर्शनाचे आमिष दाखवून बीडच्या महिलांकडून पिंपरी-चिंचवडमध्ये 'बोगस मतदान..! निवडणुकीनंतर मोठा गौप्यस्फोट

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बीड : प्रतिनिधी 
नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जेजुरीला देवदर्शनासाठी नेण्याचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यातील महिलांना पिंपरी-चिंचवडमध्ये आणून त्यांच्याकडून बोगस मतदान करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
                       मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथील एका महिला बचत गटातील महिलांना काही राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र केले. "तुम्हाला देवदर्शनासाठी जेजुरीला घेऊन जातो," असे सांगून १४ जानेवारी रोजी रात्री त्यांना एका खासगी गाडीतून नेण्यात आले. मात्र, सकाळी डोळे उघडले तेव्हा या महिला जेजुरीऐवजी पिंपरी-चिंचवडमध्ये होत्या. 
बळजबरीने हातात सोपवली बोगस मतदार कार्डे
पिंपरी-चिंचवडला पोहोचल्यानंतर प्लॅन बदलला आहे असे या महिलांना सांगण्यात आले. त्यानंतर १५ जानेवारी रोजी सकाळी या महिलांच्या हातात बोगस मतदान कार्डे देण्यात आली आणि त्यांना मतदान करण्यास भाग पाडले गेले. आपल्यावर दबाव टाकून हे मतदान करून घेतल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.

घडलेला सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलांनी थेट बीड गाठले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन तक्रार दिली आहे. दुबार आणि बोगस मतदानाचा हा मुद्दा आता ऐरणीवर आला असून, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण आणि कोणत्या राजकीय पक्षाने हा प्रकार घडवून आणला याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. 

या गंभीर तक्रारीनंतर आता पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडमधील काही जागांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Tags
To Top