सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (दोन्ही गट) बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पराभवाचा धक्का पचवत आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादीने मोठे पाऊल उचलले आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. बारामती येथील 'कृषिक २०२६' प्रदर्शनाच्या निमित्ताने गोविंद बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू आणि पुन्हा जोमाने कामाला लागू मात्र, दोन्ही पक्ष पूर्णपणे एकत्र येण्याबाबत किंवा विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'कृषिक'च्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच मंचावर
बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित 'कृषिक २०२६' कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सर्वजण एकाच मंचावर दिसून आले. या निमित्ताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
