Purandar News l पुरंदरमध्ये उमेदवारीचा सस्पेन्स कायम...! झेडपी-पंचायत समिती निवडणुकीआधीच युती-आघाडीचे राजकारण रंगतदार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजून चार दिवस उलटले असले तरी पुरंदर तालुक्यात अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. महानगरपालिकेच्या निकालानंतर सावध झालेल्या पक्षांनी ऐनवेळीच उमेदवार जाहीर करण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत असून, युती-आघाडीच्या समीकरणांमुळे पुरंदरमधील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनले आहे. 

      जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिसूचना जाहीर होऊन चार दिवस झाले तरी पुरंदर तालुक्यातील राजकीय चित्र अद्याप धूसरच आहे. चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होणार असली तरी कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

      कालपर्यंत उमेदवारी अर्ज विक्रीची संख्या १६० वर पोहोचली असली, तरी राजकीय पक्षांच्या पातळीवर अर्ज भरण्याबाबत फारसा उत्साह दिसून येत नाही. अनेक पदाधिकारी व इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर ‘आम्हीच उमेदवार’, ‘उमेदवारी पक्की’ अशा पोस्ट्स व प्रचारात गुंतले असले तरी प्रत्यक्षात पक्षाची अधिकृत मोहर मिळेल का, याबाबत ते स्वतःही अनिश्चित आहेत. 

     पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला फटका आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही बसू नये, यासाठी हालचाली वेग घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी आज रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीला गेले असून, एकत्रितपणे निवडणूक लढवण्याबाबत सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवर मतविभाजन टाळणे, हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचे समजते. 

       दुसरीकडे, कालपर्यंत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतलेल्या भाजपमध्येही रणनीतीत बदल होत असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा जिल्हाध्यक्ष बसवण्याच्या दृष्टीने भाजपकडून शिवसेनेसोबत युती करण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यासाठी भाजप काही जागांवर तडजोड करण्यास तयार असल्याची चर्चा असून, युतीचे गणित जुळल्यास पुरंदर तालुक्यातील लढतींचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. 

      एकूणच, उमेदवार जाहीर न होता, युती-आघाडीच्या चर्चांनी वेग घेतल्याने पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ऐनवेळी होणाऱ्या घोषणा आणि अचानक बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार, हे मात्र निश्चित आहे.
To Top