सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे जिल्हा परिषद गटामध्ये कुरघोडीच्या आणि गटातटाच्या राजकारणामुळे सुप्यातील नवोदित उमेदवाराचे तिकीट कापले गेले. मात्र ज्या नवोदित उमेदवाराने जुन्या पदाधिकाऱ्यांचा घसा कोरडा करण्याची वेळ आणली याचीच चर्चा सुप्यात सर्वत्र झडू लागली आहे.
येथील जिल्हा परिषद गटातील आरक्षण इतर मागासवर्गिय महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे सुप्यातून अनेक इच्छुकांनी तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबात उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी तोबा गर्दी केली होती. त्यामध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या घरातील सुनांचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला होता. तसेच आपल्याच घरात तिकीट कसे येईल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने खुद्द अजित पवार यांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली. यावेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना जुन्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबात पुन्हा उमेदवारी देणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे जुने पदाधिकारी नाराज झाले.
मात्र आपल्याला तिकीट मिळत नाही हे जुन्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आपला नूर बदलत आपल्या वरचढ सुप्यात कोण होणार नाही ना? याची चाचपणी करीत राहिले. अखेरच्या क्षणी जिल्हा परिषद गटाचे तिकीट सुप्यातील नवोदित उमेदवाराला दिल्याची चर्चा सुरु झाली. अन याच चर्चेने कुठंतरी माशी शिंकली. त्याच क्षणी माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी तिकीट सुप्यात दिले तर आम्ही पक्षाचे काम करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. अन अखेर सुप्याचे तिकीट कापले गेले.
मात्र ज्या उमदी नवोदित उमेदवाराचे नाव एकदम चर्चेत आल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांचा जळफळाट झाला. त्यांचा घसा कोरडा पडण्याची वेळ आली. याचीच चर्चा सुप्यात सर्वत्र झडू लागली आहे. त्यामुळे भविष्यात कुरघोडीच्या आणि गटातटाच्या राजकारणाची मुळे खोलवर जाऊन सुपे गावाचे नुकसान तर होणार नाही ना ? याचीच धास्ती मतदारांना वाटत आहे.
.........................................
