Daund News l संदीप नवले l साखर कारखान्यांना मागे टाकत गुऱ्हाळघरांचा 'रेकॉर्डब्रेक' ऊसदर : ऊसाला मिळतोय टनाला ४२०० रुपयांचा ऐतिहासिक भाव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दौंड : संदीप नवले
साखर कारखान्यांच्या ऊस दराच्या तुलनेत आता गुळनिर्मितीसाठी खासगी गुऱ्हाळघरांवर गाळप होत असलेल्या ऊसाला प्रतिटन सुमारे चार हजार दोनशे रुपये दर मिळत असल्याने सध्यातरी शेतकऱ्यांमध्ये गुऱ्हाळघरांवरील ऊसदरच लय भारी मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
      इतिहासात पहिल्यांदाच एवढा उच्चांकी दर मिळाला असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
              दौंड तालुक्यात ऊसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पश्चिम पट्ट्यातील राहूबेट परीसरात यंदाच्या हंगामामध्ये गु-हाळघरावर गुळ निर्मितीसाठी गाळप कऱण्यात येत असलेल्या ऊसाची मागणी वाढत आहे.सध्या गुळाच्या बाजारभावामध्ये बऱ्यापैकी वाढ होत असल्याने गुढीपाडव्यापर्यंत आगामी दिवसात ऊसाचा प्रतिटन दर हा सुमारे चार हजार पाचशे रुपयांच्या पुढे देखील पोहचण्याची शक्यता आहे.गुळ सध्या तीन ते ३७०० रु क्विंटलच्या आसपास विकला जात असून उन्हाची तीव्रता वाढल्याने सरासरी गुळ उताराही वाढत आहे.एकीकडे साखर कारखान्यानांकडे गाळपासाठी दिलेल्या ऊसाला सध्यातरी दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये एवढाच दर मिळाला आहे.जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने चालु गाळप हंगामामध्ये ऊसाची प्रतिटन पुर्ण रक्कम जाहीर केली नसल्यामुळे शेतकरी सध्या गु-हाळघरावर समाधानकारक  मिळत असलेल्या दरामुळे ऊस गाळपास पसंती देत आहेत.सध्या परीसरातील गु-हाळघरावर मोठ्या प्रमाणावर गुळनिर्मितीसाठी ऊसाची तोडणी कऱण्यात येत असल्यामुळे आगामी साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर यांचा चांगलाच परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारखान्यापेक्षा ऊसाला चांगला दर मिळतो पैसैही लवकर मिळतात व वेगाने कमी कालावधीमध्ये ऊसाचे गाळप झाल्याने शेतकऱ्यांना कांदा व गहू आदी पिकांचे उत्पादन घेणे सोपे जाते.
     गु-हाळघरावर साखर कारखान्याच्या तुलनेत सध्या जास्तीचा दर मिळत असून जीवापाड जपलेल्या शेतमालाचे तसेच कष्टाचे चिज होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
......................................................................
शेतीमध्ये मशागतीचा खर्च,ऊसाचे बेणे,खताच्या वाढलेल्या किमंती,मजुरीचे वाढलेले दर याचा विचार करता सध्या मिळत असलेला भाव समाधानकारक आहे.मात्र जास्तही नाही.
-कैलास गरुड - शेतकरी
........    .......   
बाजारपेठेतील गुळाचे बाजार भाव पाहता गु-हाळ चालवणे म्हणजे सध्या मोठी कसरत होत असून केवळ मजूर वर्ग सांभाळण्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर व्यवसाय करावा लागत आहे.
- संजय नवले - (गु-हाळ चालक राहू)

To Top