सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती व वैकुंठप्राप्ती लाभावी, या उद्देशाने डोर्लेवाडी (ता. बारामती) ते पंढरपूर सायकलवारी काढण्यात आली. डोर्लेवाडी सायकल क्लबच्या या सामजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
स्व. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजूनही जनता या दुःखातून बाहेर आलेली नाही.बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान, प्रशासनातील शिस्त, पर्यावरणाबाबतची जागरूकता आणि समाजातील एकात्मतेसाठी केलेले कार्याची आठवण कायम राहावी व त्यांच्या विचारांचा वारसा समाजात जपला जावा, या भावनेतून या सायकलवारीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुभाष ढोबळे यांनी दिली. ही सायकल मोहीम पहाटे तीन वाजता डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज मंदिर येथून दर्शन घेऊन सुरू झाली. सायकलस्वारांनी कळंब, नातेपुते, माळशिरस मार्गे सुमारे ११० किलोमीटरचा प्रवास करत सकाळी ९ च्या दरम्यान पंढरपूर गाठले. मार्गात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी सायकलस्वारांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन दिले.काही ठिकाणी अल्पोपहाराचीही व्यवस्थाही करण्यात आली होती. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर सर्व सायकलस्वारांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले व स्व. अजित पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी,अशी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वच्छता,वृक्षारोपण आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या सायकलवारीत डोर्लेवाडी येथील सुभाष ढोबळे, राजाभाऊ शिंदे, सोमनाथ भिले, विजय निकम,महेश बोराटे,सुरेश ढमाळ तसेच अकलूज येथील सुजित बामनकर व सचिन डुबल यांनी सहभाग घेतला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डोर्लेवाडी सायकल क्लबच्या मनोज काळेबेरे, दीपक नाळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
अजित पवार यांनी राज्यासह बारामतीच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे.ते एकमेव धर्मनिरपेक्ष असे व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या सामाजिक कार्याचा आम्हाला नेहमीच अभिमान होता.आहे व कायम राहील, म्हणूनच आम्ही त्यांना सायकलवारीच्या निमित्ताने श्रद्धांजली समर्पित करीत आहोत. त्यांच्या कार्याचा वसा व वारसा यापुढेही आम्ही कायम जपू असे मत सहभागी सायकलस्वार सोमनाथ भिले, राजाभाऊ शिंदे, विजय निकम यांनी व्यक्त केले.
