सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील जांभळी येथे एका होयेलाच्या परिसरात एका वृद्धाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत व्यक्तीचे नाव किसन बाप्पु सुर्वे (वय ७९, सध्या रा. जांभळी, मूळ रा. भोंगवली ता. भोर) असे असून ते हॉटेलशेजारी टपरी चालवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुर्वे हे त्यांच्या जावई अनिल रसाळ यांच्या हॉटेल येथे रोजप्रमाणे रात्री झोपण्यासाठी थांबत असत.
मंगळवार (दि. २४ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमधील आचारीने अज्ञात कारणावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुरावे संकलन सुरू केले. पोलीसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून, ही हत्या पूर्वनियोजित होती की वादातून घडली याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे जांभळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
