सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : निलेश काशीद
फलटण तालुक्यातील अळजापूर गावात यात्रा कमिटीच्या वादाने उग्र रूप धारण करत थेट हिंसाचारात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनुमान मंदिरासमोर भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास यात्रा कमिटी व अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून गावात वाद सुरू झाला. या वादाने अचानक पेट घेत काही जणांनी एकत्र येत हल्ला चढवला.
एका तक्रारीनुसार, सुशांत हणमंत पवार (वय ३२) व त्यांच्या चुलत्यावर आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या गोंधळात पवार यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता संतप्त आरोपींनी बोलेरो गाडीवर दगडफेक करत काचा फोडून नुकसान केल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, दुसऱ्या तक्रारीनुसार हरिभाऊ नरसिंग नलवडे (वय ५८) यांनाही याच घटनेदरम्यान सात जणांच्या गटाने मारहाण केल्याची नोंद आहे. यात्रेच्या बैठकीतून सुरू झालेल्या वादातूनच त्यांना लक्ष्य करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या धक्काबुक्कीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व लॉकेट तुटून गहाळ झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणी सुशांत पवार, ऋषिकेश नलवडे, चंद्रकांत पवार, अजय पवार, निलेश नलवडे, बापूसाहेब नलवडे आणि सागर नलवडे यांच्यासह संबंधितांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मारहाण प्रकरणी परस्पर तक्रार दाखल करण्यात आली असून नितीन आप्पासो नलवडे, ऋतुराज तुकाराम नलवडे, जयदीप शिवाजी नलवडे, सुयश भाऊसो नलवडे , भाऊसो राजाराम नलवडे, विरेंद्र तुकाराम नलवडे, अनिकेत रवींद्र नलवडे, सचिन दिलीप नलवडे सर्व रा आळजापूर ता फलटण जि सातारा यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप अटक झाल्याची माहिती मिळालेली नसून पोलीस तपास वेगाने सुरू आहे.
या घटनेमुळे अळजापूरमध्ये यात्रा कमिटीचा वाद थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, भविष्यात आणखी तणाव वाढण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
