सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे नात्यातील अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रवींद्र गार्डी (वय ५२) या आरोपीने पोलीस ठाण्याच्या कारागृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला होता. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला फलटणमधील एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
या प्रकरणी पोलिसांनी शारीरिक अत्याचारासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलीस कोठडीत असताना सकाळी सातच्या सुमारास आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
