सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असून, त्यांच्याविरोधात आतापर्यंत पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल केलेले हे पाचही उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत.
बाहेरील जिल्ह्यांतील उमेदवारांचे आव्हान
३० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत खालील उमेदवारांनी दंड थोपटले आहेत सतीश कदम (जत) हिंदुस्तान जनता पार्टी, राघू घुटूकडे (सांगोला) न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, शरद भिसे (सातारा) अपक्ष, गजानन गवळी (बुलडाणा) अपक्ष, त्रिशला कांबळे (उल्हासनगर) अपक्ष
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास, काँग्रेसने ही जागा लढविण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, जर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (शरद पवार गट) दावा केला नाही, तर काँग्रेस उमेदवार उभा करेल. मात्र, अद्याप काँग्रेसकडून कोणताही अर्ज दाखल झालेला नाही.
दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत अजित पवारांविरुद्ध लढलेले युवा नेते युगेंद्र पवार यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. सात एप्रिलला अर्जांची छाननी आणि नऊ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मुदतीनंतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास २३ एप्रिल रोजी मतदान आणि चार मे रोजी मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत अर्ज दाखल केलेले पाचही उमेदवार हे पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत
अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात आणि काँग्रेस खरंच आपला उमेदवार उतरवते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
