सातारा | खत विक्रीतील अनियमितता व साठ्यात तफावत ; आठ कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा : प्रतिनिधी
खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांवर धडक कारवाई करत 8 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
खत विक्रीत अनियमितता, पॉस मशिनचा वापर न करणे, मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठ्यात तफावत, तसेच शेतकऱ्यांना योग्य बिले न देणे अशा गंभीर बाबी तपासणीत उघड झाल्या. जिल्हास्तरीय भरारी पथकांमार्फत एप्रिल महिन्यात ही कारवाई करण्यात आली.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याचे सांगत, खत वितरणात कोणताही काळाबाजार होऊ नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषि विभागाने दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे व किटकनाशक विक्री केंद्रांची तपासणी मोहीम सुरू असून, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत 22 बियाणे उत्पादक कंपन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, खत उत्पादक कंपन्यांची तपासणी सुरू आहे.
कृषि विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, बियाणे, खते व औषधे खरेदी करताना नामांकित कंपनीची उत्पादने घ्यावीत व पक्के बिल घ्यावे.

तक्रार नोंदणीसाठी आवाहन :
निविष्ठांबाबत तक्रार असल्यास पंचायत समिती व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवहीत नोंद करावी. तसेच 9822664455 व 7498921284 या व्हॉटसॅप क्रमांकांवरही तक्रार नोंदवता येणार असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
To Top