Satara Crime l सातारा जिल्हा रुग्णालय अर्भक मृत्यू प्रकरण : डॉक्टरवर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
सातारा जिल्हा रुग्णालयातील एका अल्पवयीन मुलीच्या अर्भकाच्या मृत्यू प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाहेब शिकलगार यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली होती.
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीने अर्भकाला जन्म दिला होता. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या अर्भकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, आरोग्य मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे आणि डॉ. चांदसाहेब शिकलगार यांना निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचपर्यंत पोहोचले होते. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य उपसंचालक डॉ. पवार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. डॉ. पवार यांनी केलेल्या सखोल चौकशीत डॉ. शिकलगार यांच्याविरोधात अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान जन्मलेले बाळ जिवंत असूनही, त्याच्यावर आवश्यक ते उपचार करण्यास डॉ. शिकलगार यांनी टाळाटाळ केली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साधना कवारे आणि परिचारिका अनिता मसुगडे यांनी बाळ जिवंत असल्याचे सांगून त्याला तातडीने SNCU (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्याची सूचना केली होती.

 सहकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत डॉ. शिकलगार यांनी "मी काय आहे, ते बघून घेतो" अशी भूमिका घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. "अर्भकाचा मृत्यू होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असूनही, जाणीवपूर्वक योग्य उपचार न दिल्याने अर्भकाचा मृत्यू ओढवला," असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे सातारा वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय गोंधळ आणि डॉक्टरांच्या अशा वृत्तीमुळे सामान्य रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
To Top