सोमेश्वर रिपोर्टर टीम----
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे
पुरंदर तालुक्यातील कोळविहिरेजवळील कुदळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बळावर संपूर्ण तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाडी-वस्तीवरील ही शाळा आज पालकांची पहिली पसंती ठरत असून विविध स्तरांतून शाळेचे, शिक्षकांचे आणि ग्रामस्थांच्या सहभागाचे कौतुक होत आहे.
मुख्याध्यापक सुरेश जगताप आणि सहशिक्षिका सुनीता जगताप विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन यामुळे शाळेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शिक्षकांनी केवळ नोकरी न करता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समर्पित भावनेने काम केल्यास ग्रामीण भागातील शाळाही यशाचे शिखर गाठू शकते, याचे कुदळेवाडी शाळा हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या शाळेत केवळ कुदळेवाडीतीलच नव्हे, तर जेजुरी, कुतवळ वस्ती, मावडी पिंपरी, कोळविहिरे आणि परिसरातील अनेक पालक आपल्या पाल्यांना आवर्जून प्रवेश देत आहेत. शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांवर होणारे वैयक्तिक लक्ष आणि विविध उपक्रमांमुळे शाळेचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.
शाळेच्या प्रगतीमध्ये माजी मुख्याध्यापक विजय कापरे आणि सहशिक्षिका पुष्पा हिंगणे (साबळे) यांचेही मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. विशेष म्हणजे, त्यांच्या बदलीचा आदेश रद्द व्हावा, यासाठी ग्रामस्थ आणि महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयावर शिष्टमंडळासह मोर्चा काढला होता. शिक्षकांप्रती असलेला ग्रामस्थांचा विश्वास आणि प्रेम दर्शविणारी ही घटना आजही परिसरात चर्चेचा विषय आहे.
प्रश्नमंजुषा, समूहगीत, कविता गायन, वेशभूषा, सामान्य ज्ञान, वैयक्तिक गायन आदी विविध स्पर्धांमध्ये शाळेने बीट स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचे पाठांतर, वक्तृत्व आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणालाही विविध स्तरांवर दाद मिळत आहे.
शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांचेही मोठे योगदान लाभत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे, सदाशिव कुदळे, श्रीपती झगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुदळे, शांताराम कुदळे, अनिल कुदळे, धनश्री कुदळे, पोलीस पाटील सोनाली कुदळे, तसेच अशोक झगडे, सतीश झगडे, दिलीप कुदळे, उद्योजक धनंजय कुदळे, प्रशांत शिंदे, सचिन कुदळे, अंगणवाडी सेविका मंगल रासकर, मदतनीस विद्या शिंदे आणि इतर ग्रामस्थ सातत्याने शाळेला सहकार्य करत आहेत. शाळेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत १४ मे २०२६ रोजी पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कुदळेवाडी प्राथमिक शाळेला 'आदर्श शाळा पुरस्कार' आणि 'वसंतदादा पाटील गौरव पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याचबरोबर शाळेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या डॉ. प्राजक्ता ताई दिगंबर दुर्गाडे तसेच पुरंदर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या स्मिताताई संतोष (आबा) निगडे यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक करत भविष्यातही शाळेने अशीच शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाच्या बळावर तालुक्यात आदर्श ठरू शकते, हे कुदळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले आहे.
