सोमेश्वर रिपोर्टर टीम----
खटाव : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथील गरवारे वस्तीवर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि वडूज पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून मोठा स्फोटकसाठा जप्त केला. या कारवाईत १,८०० जिलेटिन कांड्या, सुमारे ८ हजार डिटोनेटर्स तसेच कार्टेक्स, सेफ्टी फ्यूज आणि दोन चारचाकी वाहनांसह एकूण १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी विशाल लक्ष्मण जाट, बारुलाल लक्ष्मण जाट (सध्या रा. मायणी, मूळ राजस्थान) आणि शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी) यांच्याविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे हवालदार अजित करणे यांनी दिलेल्या खबरी जबाबानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मायणी येथील गरवारे वस्तीत जिलेटिन स्फोटकांचा बेकायदेशीर साठा व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार हवालदार करणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, स्वप्निल दौंड तसेच वडूज पोलिसांचे उपनिरीक्षक एस. एस. शिंदे आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर सुमारे सव्वाबारा वाजता छापा टाकला.
कारवाईदरम्यान घटनास्थळी दोन चारचाकी वाहने आणि दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर पंचासमक्ष वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाचे बॉक्स आढळले. बॉक्सवर स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीचे नाव असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातारा नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.
त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. तपासणीत वाहनांमध्ये स्फोटक साहित्य असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने, एक ४०७ वाहन, १,८०० जिलेटिन कांड्या, सुमारे ८ हजार डिटोनेटर्स, कार्टेक्स आणि सेफ्टी फ्यूज असा एकूण १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणाचा पुढील तपास वडूज पोलीस करीत असून, हा स्फोटकसाठा नेमका कशासाठी आणण्यात आला होता, तसेच त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
