Baramati Breaking | वाघळवाडीतील अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : अक्षय इथापे 
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दि. ११ रोजी 
स्कॉर्पिओ व एका दुचाकीमध्ये अपघात झाला होता. यामध्ये एक १९ वर्षीय महाविद्यालयीन युवक जखमी झाला होता. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
      या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दि. ११ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने करण शरद भगत (वय १९, रा. मुर्ती-भगतवस्ती) हा युवक गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने वाघळवाडी येथील साईसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
 त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला त्याच दिवशी पुण्यातील केएम हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज (दि. १६) दुपारी उपचारादरम्यान करण भगत याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, वाघळवाडीतील हा दीड किलोमीटरचा रस्ता वारंवार अपघात घडत असल्याने 'मृत्यूचा सापळा' ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वेगमर्यादा, स्पीड ब्रेकर, इशारा फलक तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
To Top