सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या हायवा टिपरचा अवघ्या काही दिवसांत शोध लावत पोलिसांनी दोन अट्टल आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांच्या तत्पर तपासामुळे हायवा टिपर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे मुढाळे (ता. बारामती, जि. पुणे) येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पंपहाऊसवर उभा असलेला हायवा टिपर अज्ञात चोरट्यांनी २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० ते २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० या कालावधीत चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून २३ जुलै २०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या विशेष पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर वाळूंज एमआयडीसी, संभाजीनगर येथे सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपी राहुल विठ्ठल कराळे (वय ३१), रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर, व आदित्य रमेश कराळे (वय २५), रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला हायवा टिपर हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भागवत पाटील करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस हवालदार भागवत पाटील, महेश चन्नाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड तसेच पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले आणि विकास येडगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांवर प्रभावी वचक निर्माण झाला असून, परिसरातील नागरिकांनी वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
