सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती–निरा रोडलगत असलेल्या हॉटेल दरबार येथे एका व्यक्तीस मारहाण करून दोन लोखंडी कोयते दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 17 जुलै 2026 रोजी बारामती–निरा रोडलगत असलेल्या हॉटेल दरबार, वडगाव निंबाळकर येथे घडली. तक्रारीनुसार, दोन आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील दोन लोखंडी कोयते दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेत वापरण्यात आलेले दोन्ही लोखंडी कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश पन्हाळे करीत आहेत.
