Baramati News | जिद्द, चिकाटी आणि सातत्याचा विजय; कानाडवाडीच्या निकेतन कोळेकरचे महापारेषण विभागात २६ व्या रँकने यश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते, हे कानाडवाडी (चोपडज) येथील निकेतन संपत कोळेकर याने सिद्ध करून दाखवले आहे. महापारेषण विभागाच्या स्पर्धा परीक्षेत त्याने राज्यात २६ वा रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले असून परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निकेतनने मार्च २०२४ पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. या प्रवासात सलग ७ ते ८ वेळा अपयश आले. मात्र, प्रत्येक अपयशातून धडा घेत त्याने जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. अखेर कठोर परिश्रमाचे फळ मिळवत त्याने महापारेषण विभागात २६ वा रँक मिळवला.

निकेतनचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, कानाडवाडी येथे झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल, पांढरवस्ती येथे दहावीपर्यंतचे शिक्षण, तर सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर येथे विज्ञान शाखेत बारावी पूर्ण केली. पुढे शरदचंद्रजी पवार इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वरनगर येथून स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारला. सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सलग दोन वर्षे अभ्यास करून त्याने स्वतःला घडवले.

"माझ्या यशात आई-वडील आणि मित्रांचा मोठा वाटा आहे," अशी भावना निकेतनने व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले महेश भगत यांचे मार्गदर्शन, तसेच शासकीय सेवेत कार्यरत मित्र विठ्ठल कोळेकर आणि निखिल थिटे यांची मोलाची साथ त्याला लाभली. याशिवाय विवेकानंद अभ्यासिका आणि गणेश सावंत यांचे मार्गदर्शनही त्याच्या यशामागील महत्त्वाचा आधार ठरले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश मिळवावे, असा प्रेरणादायी संदेश निकेतन कोळेकरच्या यशातून मिळत आहे.

To Top