Baramati News | सोमेश्वर वाचनालयाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
सोमेश्वर वाचनालयाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता खेळीमेळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी कै. मा. श्री. अजित अनंतराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून सभेचा प्रारंभ झाला.
सभेच्या अध्यक्षस्थानी मु. सा. काकडे महाविद्यालयाचे सचिव मा. श्री. सतीश लकडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे आणि सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद जगताप उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे संचालक मंडळ, महाविद्यालय व विद्यालयातील आजीव सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संजू जाधव यांनी प्रास्ताविक करताना सन २०२१ ते २०२६ या कालावधीत झालेल्या विकासकामांचा आढावा मांडला. वाचनालयाची स्वतंत्र वेबसाइट, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका, मोफत वाय-फाय, भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पुस्तके, नियमित १६ वर्तमानपत्रे व ७२ मासिके, तसेच अल्प दरात सभासदांना घरी वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध जयंती, व्याख्याने व सांस्कृतिक उपक्रमही नियमित राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यवाह उदयसिंह जगताप यांनी मागील सभेचा वृत्तांत व चालू वर्षाच्या सभेचा अजेंडा सादर केला. अंतर्गत हिशोब तपासनीस प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी २०२५-२६ चा लेखापरीक्षण अहवाल सादर केला, तर कार्याध्यक्ष प्रा. अनिल निगडे यांनी २०२६-२७ चे अंदाजपत्रक मांडले. दोन्ही प्रस्तावांना सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली.
प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या मनोगतात वाचनालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेत, नव्या इमारतीसाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, चेअरमन मा. श्री. पुरुषोत्तम दादा जगताप, तसेच दिवंगत कै. अजित दादा पवार यांनी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाचनालयासाठी पुस्तक खरेदीसाठी मिळालेल्या ५० हजार रुपयांच्या देणगीचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

सभेत अभ्यासिकेतील प्रकाशव्यवस्था वाढविणे, पुस्तकांची संख्या वाढविणे, प्रत्येक आजीव सदस्याने वाचनालयाला किमान दोन पुस्तके भेट देणे तसेच सेवानिवृत्त सदस्यांचा सन्मान करण्याचे प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संजू जाधव यांनी वाचनालयासाठी ₹५,००० रुपयांचा धनादेश प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते सुपूर्द केला.

सभेचे अध्यक्ष मा. श्री. सतीश लकडे यांनी वाचनालयाच्या प्रामाणिक व उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रंथपाल श्री. अजित जगताप व सौ. जगताप यांचा सत्कार केला. तसेच सन २०२१ ते २०२६ या कार्यकाळातील संचालक मंडळाचा गौरव करण्यात आला. नव्याने बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे सभेत जाहीर करून त्यांचाही सत्कार करण्यात आला.

ग्रंथपाल श्री. अजित जगताप यांनी सभेचे नियोजन केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र होळकर यांनी केले, तर प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. अल्पोपहार व चहापानानंतर सभेची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली
To Top