Bhor Breaking l 'वर्दी' आणि 'पत्रकारिते'च्या नावाखाली दरोड्याचा कट; एक कोटींच्या रोकड दरोडा कटाचा पर्दाफाश; तोतया पत्रकार अटकेत, दोन पोलीस कर्मचारी फरार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
खेडशिवापूर : प्रतिनिधी 
पुणे स्टेशनरी व्यावसायिकाच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या रोकडवर दरोडा टाकण्याच्या कटाचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारा आशिष सुबालाल तिवारी याला अटक करण्यात आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांतील खेड शिवापूर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार प्रमिला निकम व अजित मेस्त्री यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी सध्या फरार असल्याची माहिती आहे.
१८ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत, संबंधित व्यावसायिक बँकेत एक कोटी रुपयांची रोकड जमा करण्यासाठी निघाला असताना नवले पुलाजवळ काही जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवत त्याची कार अडवली. रोकड हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असताना कारचालकाने वाहन जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत नेले. तपासात कारचालक विक्रम विलास चाकणकर हा कटातील सहभागी असल्याचे उघड झाले.
पोलीस चौकीत पोहोचल्यानंतर आरोपी विक्रम चाकणकर, अमेय कारले, गणेश कदम, आशिष तिवारी, प्रमिला निकम आणि अजित मेस्त्री यांच्यात रोकडीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणीही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर व्यावसायिकाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने विक्रम चाकणकर, अमेय कारले आणि गणेश कदम यांना अटक केली. पुढील तपासात आशिष तिवारी यालाही अटक करण्यात आली असून, प्रमिला निकम व अजित मेस्त्री यांचा शोध सुरू आहे.

नियोजनबद्ध कटाचा आरोप
तपासात आरोपींनी व्यावसायिकाच्या रोकडवर डल्ला मारण्यासाठी नियोजनबद्ध कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना सुरू झाल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी नऱ्हे पोलिसांना दिल्यानंतर तपासाला वेग मिळाला आणि संपूर्ण कट उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.

इतर आरोपांचीही चर्चा
या प्रकरणानंतर आशिष तिवारी हा मागील काही काळापासून खेड शिवापूर पोलीस चौकीत वारंवार वावरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच परिसरातील काही व्यावसायिकांकडून धमकावून वसुली केल्याच्या आरोपांचीही चौकशी होण्याची मागणी होत आहे. याशिवाय त्याचे काही गुन्हेगारांशी संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला असून, त्याची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

मोक्का कारवाईची शक्यता?
या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी आणि स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या व्यक्तीचा सहभाग समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत असून, या टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
To Top