Indapur News l बंदी कागदावरच? इंदापूरात पुन्हा खुलेआम गुटख्याची ठराविक ग्राहकांनाच 'सीक्रेट' विक्री

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : संतोष माने
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध गुटखा विक्रीला मोठा आळा बसला होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धाडसी कारवाईने अनेक गुटखा माफियांचे धाबे दणाणले होते. अगदी गावातील पानटपऱ्यांवर सहज उपलब्ध होणारा गुटखाही गायब झाला होता.

मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पूर्वीप्रमाणे किराणा दुकाने असोत किंवा पानटपऱ्या, इंदापूर तालुक्यात पुन्हा सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरुवातीला अवैध गुटखा विक्रीवर धाडसत्र सुरू केले. त्यानंतर हॉटेलमधील स्वच्छता, ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, तसेच वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरावर बंदी अशा विविध बाबींवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्यांनी दूध भेसळीविरोधातही मोहीम हाती घेतली. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

असे असले तरी, गेल्या आठ दिवसांपासून इंदापूर तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आम्ही एका ठिकाणी ग्राहक म्हणून गेलो असता, गुटख्याची मागणी केली. मात्र संबंधित दुकानचालकाने, "आम्ही गुटखा विक्री करत नाही," असे सांगितले. त्याचवेळी त्यांचे काही ठराविक ग्राहक गुटखा घेण्यासाठी आले असता, त्यांना मात्र हळूच गुटखा देण्यात आला.

त्यानंतर आम्ही गुटखा घेणाऱ्या व्यक्तीला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, "आठ दिवसांपूर्वीपासून आम्हाला गुटखा मिळत आहे. मात्र, दुकानचालक किंवा पानटपरी चालक ठराविक व्यक्तींनाच गुटखा देतो."

कायदा कितीही कडक असला, तरी त्यातील पळवाटा शोधणारे त्यापेक्षाही अधिक असतात, हे सांगण्यासही अनेक जण विसरले नाहीत. आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे याकडे पुन्हा लक्ष देणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
To Top