Phaltan Breaking l दूध काढण्याच्या मशीनच्या विजेचा शॉक; २८ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू : गुणवरे येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
फलटण : गणेश पवार
फलटण तालुक्यातील गुणवरे येथे दूध काढण्याच्या मशीनचा विजेचा शॉक लागून २८ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी घडली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका तानाजी कर्णे (वय २८, रा. गुणवरे, ता. फलटण) या पती तानाजी कर्णे यांच्यासमवेत नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यात म्हशीचे दूध काढत होत्या. दूध काढून झाल्यानंतर मशीनला जोडलेल्या कॅनचे झाकण बोर्डाला अडकवण्यासाठी जात असताना त्यांना अचानक विजेचा शॉक बसला.
प्रियंका यांनी आरडाओरडा केल्यावर पती तानाजी कर्णे यांनी तातडीने धाव घेत त्यांना विद्युत प्रवाहापासून दूर केले. मात्र त्या बेशुद्ध झाल्या होत्या. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू  नुसार नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी गोठ्यातील तसेच शेतातील विद्युत उपकरणे, वायरिंग व विद्युत जोडण्यांची नियमित तपासणी करून घ्यावी, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले आहे.
To Top