सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिजाच्या चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर थेट जेसीबी चालवून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शासकीय वाहनाचे नुकसान करून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारामुळे गौण खनिज माफियांची वाढती मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
महसूल विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (दि. २०) रात्री तांबवे धरण परिसरात छापा टाकला असता धरणातील माती जेसीबीच्या साहाय्याने बिगर क्रमांकाच्या टिपरमध्ये भरून चोरी सुरू असल्याचे आढळले. कारवाईची चाहूल लागताच जेसीबी चालकाने शासकीय स्कॉर्पिओवरच जेसीबीची फरांडी आदळून वाहनाचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात जेसीबी पलटी झाली. मात्र बिगर क्रमांकाचा टिपर घेऊन दुसरा चालक पसार झाला.
या प्रकरणी तानाजी शेळके (रा. निंबोडी, ता. खंडाळा) तसेच जेसीबी व टिपरवरील अज्ञात चालकांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने गौण खनिज चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याची प्रचिती आली आहे. शासकीय अधिकाऱ्यांवरच हल्ला करून कारवाई हाणून पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा माफियांना कोणाचे संरक्षण आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने या टोळीचा तातडीने पर्दाफाश करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. जगताप करत आहेत
