सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून प्रशासकीय इमारत जमीनदोस्त झाल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. गेल्या २२ तासांपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत १७ जणांना ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या माहितीनुसार अजूनही सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
मोशी कचरा डेपोमध्ये अनेक वर्षांपासून शहरातील घनकचरा साठवला जात असल्याने तेथे कचऱ्याचे प्रचंड ढिगारे निर्माण झाले आहेत. याच परिसरात 'अँटनी लॉरा' कंपनीकडून कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पालगत पार्किंगसह दुमजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा थेट या इमारतीवर कोसळला आणि इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली.
दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. मोठी यंत्रे वापरल्यास इमारत आणखी कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे अडकलेल्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगत ब्रोकलेनच्या साहाय्याने इमारतीच्या एका बाजूला भोक पाडण्यात आले असून त्या मार्गाने एनडीआरएफचे जवान आत प्रवेश करून शोधमोहीम राबवत आहेत.
इमारतीच्या आत मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. तरीही अडकलेल्या नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी खबरदारी घेत जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून उर्वरित सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे
