सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेड येथील पोल्ट्री व्यावसायिक नितीन पासलकर व गणेश तोडकर यांच्या पोल्ट्री शेडमध्ये मंगळवारी (७ जुलै) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या घटनेत सुमारे ३ हजार कोंबड्या दगावल्या असून खाद्यसाठ्यासह पोल्ट्री शेडचेही मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन पासलकर यांच्या पोल्ट्रीमध्ये सुमारे ७,५०० कोंबड्या होत्या. पहाटे अचानक पावसाचा जोर वाढल्याने शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले.
त्यामुळे हजारो कोंबड्या दगावल्या, तर उर्वरित कोंबड्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
नलावडे यांनी संबंधित विभागाला तातडीने पंचनामा करून नुकसानाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. राजगड तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष नितीन पासलकर म्हणाले, "या आपत्तीत माझ्या कुक्कुटपालन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन योग्य नुकसानभरपाई द्यावी. तसेच तालुक्यातील इतर कुक्कुटपालन व्यावसायिकांनाही व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे." दरम्यान, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि विविध व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधितांचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
