सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : संतोष माने
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उजनी धरण रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी ८०.६३ टक्के भरले असून, धरणाची वाटचाल आता शंभर टक्के क्षमतेकडे वेगाने सुरू आहे. धरणातील वाढता पाणीसाठा पाहता सोलापूर, इंदापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीपातळी घटल्याने यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून भामा-आसखेड, खडकवासला, वरसगाव तसेच इतर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
सध्या दौंडमार्गे उजनी धरणात ६२,७८८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत आहे. मागील वर्षी २६ जुलै रोजी उजनी धरण ९५.३९ टक्के भरले होते. यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र आता वाढत्या पाणीसाठ्यामुळे आशावाद निर्माण झाला आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर संपूर्ण सोलापूर जिल्हा, इंदापूर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागाचे शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे धरणाची शंभरीकडे सुरू असलेली वाटचाल सर्वांसाठी दिलासादायक ठरत आहे.
इंदापूर तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी वरच्या धरणांतून सुरू असलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनी धरण लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
