सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : सोमेश्वरनगर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे शिवतेज सुनील ढोले यांच्या शेतावर विद्यार्थ्यांच्या सहभागातून सेंद्रिय परसबाग उभारण्यात आली. सेंद्रिय पद्धतीने विविध भाजीपाला व पिकांची लागवड करून विषमुक्त अन्ननिर्मिती, घरगुती भाजीपाला उत्पादन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी परसबागेची आखणी, वाफे तयार करणे, सेंद्रिय पद्धतीने लागवड करणे तसेच विविध पिकांची योग्य मांडणी यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.
आकांक्षा जराड, स्वाती धवणे, श्रुती घुले, वेदांतिका चव्हाण, दीक्षा शेलकांडे, देविका कांबळे, वृशिता गावित आणि भाग्यश्री गायकवाड या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग नोंदविला.
सेंद्रिय परसबागेमुळे घरच्या घरी ताज्या व विषमुक्त भाज्यांचे उत्पादन, रासायनिक निविष्ठांचा कमी वापर, कुटुंबाच्या पोषणात सुधारणा आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे अनुभवाधारित ज्ञान मिळाले असून शेतकऱ्यांमध्येही सेंद्रिय परसबागेबाबत जागरूकता निर्माण झाली.
