सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
ता. बारामती : सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय खतांच्या वापराबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषिकन्यांनी वडगाव निंबाळकर येथे पंचगव्य निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेतले. हा उपक्रम २३ ऑगस्ट रोजी राबविण्यात आला.
पंचगव्य हे देशी गाईपासून मिळणारे शेण, गोमूत्र, दूध, दही आणि तूप या पाच घटकांपासून तयार केले जाणारे सेंद्रिय मिश्रण आहे. प्रात्यक्षिकादरम्यान पंचगव्य तयार करण्याची पद्धत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली. तसेच त्याचा शेतीतील उपयोग, महत्त्व आणि वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पंचगव्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता सुधारण्यास, पिकांची वाढ चांगली होण्यास तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होऊ शकते, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर कमी करून स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या संसाधनांपासून सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर शक्य तितका कमी करून सेंद्रिय खतांचा अवलंब करावा, मातीचे आरोग्य जपावे आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वळावे हा होता. या प्रात्यक्षिकात ज्योती लोणकर, संगीता खुडे, कल्याण गायकवाड, मनीषा गायकवाड, नितीन खुडे, नंदा अटके, विमल ननावरे, सुनील जाधव आणि सुभाष राजेनिंबाळकर यांनी सहभाग घेतला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषिकन्या ऋषिता गावित, दीक्षा शेळकंदे, स्वाती ढवणे, देविका कांबळे, आकांक्षा जराड, श्रुती घुले, वेदांतिका चव्हाण आणि भाग्यश्री गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून देत शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.
