बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
रोहित पवार यांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पोलिस तपास पूर्ण झाला असून, संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सध्या कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार, दि. २३ रोजी संबंधित अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेबाबत विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मृतदेहाच्या हात-पायांना फॅक्चर असल्याने पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे सखोल तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर रुई येथील साईनगर परिसरातील पाच मजली इमारतीत गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी लिफ्टमधून इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाताना दिसून आली. त्यानंतर रात्री १० वाजून १ मिनिटांनी तिने इमारतीवरून उडी घेतल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
तपासादरम्यान आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मुलगी टेरेसवर गेल्यानंतर तिने पायऱ्यांचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. तिच्या चपलाही टेरेसवर आढळून आल्या. या सर्व बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार अनेक ठिकाणी झालेल्या फॅक्चरमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसून संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी करण्यात आल्याचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी चेतन कदम, बारामती शहर पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि बारामती ग्रामीण पोलिस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.
